गतवर्षी दिनांक २ डिसेंबरला कवीमित्र बालाजी पुजारी,सतीश हानेगावेसोबत लातूरला शिवार साहित्य संमेलनास गेलो होतो. काव्यवाचनात त्यांचं नावही पुकारलं गेलं होतं; परंतु अस्वस्थ वाटत असल्यानं बालाजी पुजारी व्यासपीठ सोडून परतले. सोबत आम्हीही परतलो. परंतु त्यांनी अॅसिडिटीचे कारण सांगून दवाखान्यात जायला नकार दिला. नाईलाजाने काही टॅबलेटस् घेऊन आम्ही परत औरादला पोचलो. रात्री त्यांना अॅटॅक आला.आम्ही घाईने दवाखान्यात नेले, परंतु काही फायदा नाही झाला. रात्री उशीरा त्यांनी जगाच्या व्यासपीठावरुन एक्झीट घेतली. ते सारं सोडून गेले.
ते कवितेच्या प्रेमात पडले होते. सुंदर सादरीकरण करत होते.आपलाही काव्यसंग्रह निघावा,अशी त्यांची मनीषा होती.कवितेची निवड चालू असतानाच ते गेले.
कवी सतीश हानेगावे,बालाजीचे कुटुंबीय यांनी काव्यसंग्रह प्रकाशित करायचे ठरवले. आणि संग्रहाला आम्ही नाव दिले- #गाता_गाता_जाईन_मी
काव्यसंग्रह निलंगा येथे मा. विश्वनाथराव वलांडे गुरुजी, कवी योगीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ तारखेला प्रकाशित होतोय.मित्राचे पुस्तकाचे स्वप्न तो गेल्यावर पूर्ण होतेय, यात आनंद मानणे एवढेच आपल्या हाती आहे. कविमित्राला हीच श्रद्धांजली.
Satish Hanegave
0 Comments